अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपायांचा केंद्रीय मंत्री गोयल यांनी आज आढावा घेतला,
राज्यांमधील अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतींवर काटेकोर लक्ष ठेवा- पीयूष गोयल
Posted Date:- May 19, 2021नवी दिल्ली, 19 मे 2021
राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतींवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, तथा रेल्वे तसेच वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आज अधिकारी वर्गाला दिले. “ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वस्तूंचा पुरेसा साठा सांभाळून ठेवण्याची खबरदारी घ्यावी, जेणेकरून अचानक होणारी भाववाढ शोषून घेऊन किंमती स्थिर राखण्यास मदत होईल”, असेही गोयल यांनी सांगितले.
एखादा गिरणीमालक, घाऊक विक्रेता अथवा किरकोळ विक्रेता, कोविड परिस्थितीचा गैरफायदा घेऊन साठेबाजी करत असल्यास राज्यांनी अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या तरतुदींची अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही केंद्रीय मंत्री गोयल यांनी केली.
राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपायांचा केंद्रीय मंत्री गोयल यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. डाळींच्या किंमतींवर दर आठवड्याला लक्ष ठेवण्याची विनंती राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे. डाळींचे गिरणीमालक, घाऊक विक्रेते, आयातदार इत्यादींची तपशीलवार माहिती भरण्यासाठी तसेच त्यांच्याकडील डाळींच्या साठ्याची माहिती भरण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना एक ऑनलाइन माहितीपत्रिका (डेटाशीट) देण्यात आली आहे. तसेच सातत्याने खरेदी होत राहिल्यास डाळींचे दीर्घकाळ उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल हे लक्षात घेऊन प्रापण अर्थात खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती डाळ उत्पादक राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे.
M.Chopade/J.Waishampayan